Published on September 6th, 2014 | by Sandeep Patil
0अष्टविनायका …
मराठी गीतांमध्ये श्रीगणेशाच्या गाण्यांना तोटा नाही. अगदी निवडक गाणी जरी ऐकायची म्हंटली तरी तासाभराची प्ले-लिस्ट सहज तयार होते. त्या मध्ये मग ‘गजानना श्री गणराया …’ आहे, ‘गणराज रंगी नाचतो …’ आहे, सकाळच्या वेळी विशेषकरून ऐकावीशी वाटणारी ‘उठा उठा हो सकळीक…’ आणि ‘तुज मागतो मी आता …’ आहेत, पं. वसंतराव देशपांडेंनी आपल्या स्वरसामार्थ्यावर पेललेलं ‘प्रथम तुला वंदितो …’ आहे. आणि बरंच काही! चार्ट मधे टॉप ला असणारं गाण जिथं महिन्याभरात विसरलं जातं अशा आजच्या FM च्या जमान्यात ही गाणी गेल्या पन्नासएक वर्षांपासून तशीच टवटवीत आहेत. उद्या जर पुण्यासारख्या ठिकाणी देखील गणेशोत्सवात ही गाणी वाजली नाहीत तर लोकांना वाटेल, खरंच गणपती आलेत की नाही. त्याउलट इथे परदेशात राहणाऱ्या माझ्यासारख्याला गणेश चतुर्थी दिवशी ही गाणी ऐकायला मिळाली आणि मोदक सोबतीला असले तर निम्माआधिक गणेशोत्सव साजरा झाल्यासारखं वाटतं.
अशा या सुश्राव्य, नादमधुर गाण्यांच्या मेळ्यात देखील एका गाण्याचा उल्लेख विशेषत्वाने करावासा वाटतो. ते म्हणजे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचं शीर्षक गीत ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा….’ हे. गेल्या २-३ दशकांत (‘श्वास’ चित्रपट येउपर्यंत) मराठी चित्रपटाची अवस्था ही केविलवाणी, दयनीय, मरणासन्न – आणि जे काही इतर समानार्थी शब्द असतील ते – अशी होती. अशा दुष्काळी कालखंडात मराठीत अगदी बोटावर मोजण्याइतके चांगले चित्रपट झाले. ‘अष्टविनायक’ हा त्यातील एक! सत्यघटनेवर आधारित कथा, अनिल-अरुण या त्या वेळेच्या हिट जोडीचं संगीत, दर्जेदार, अनुभवी कलाकार – विशेषत: विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजा गोसावींनी साकारलेला खलनायक, पं. वसंतराव देशपांडेंनी केलेली वधूपित्याची भूमिका (आणि त्यांची गाणी) अशी चित्रपटाची अनेक लहानमोठी वैशेष्ट्ये. कथानक तसं नेहमीच्या धाटणीतलं, भावनाप्रधान. राजदत्त यांचं दिग्दर्शन (हा खेळ सावल्यांचा, मुंबईचा फौजदार, दूरदर्शन वरील ‘गोट्या’ ही मालिका इ.) पण कधी फारसं भडक किंवा अतिरंजित नसायचं. साध्या साध्या प्रसंगातून त्यांचं कथानक उलगडत जायचं. हिंदीत ‘हृषीकेश मुखर्जी’ किंवा ‘बासू चटर्जी’ चे चित्रपट जसे असतात तसे. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना आपलंसं करून घेई, पडद्यावर घडणारे प्रसंग हे नेहमीचे, आजूबाजूला घडल्यापैकीच वाटत . शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, राजा गोसावी, रमेश भाटकर यांसारख्या गुणी कलाकारांच्या जिवंत अभिनयाने हे प्रसंग मनावर अधिकच ठसंत. विशेषत: नायकाचा नास्तिकपणा आणि त्यातून त्याने पाडून टाकलेले गणेश मंदिर हे प्रेक्षकांना रुचायाचे नाही – त्या प्रसंगाबरोबर इकडे पडद्यावर नायक-नायिकेची वाताहत सुरु व्हायची आणि तिकडे प्रेक्षकाच्या मनाची घालमेल देखील. चित्रपट पुढे सरकतो तशी ही दुरवस्था वाढतच जाते, चोहोबाजूंनी संकटे येत राहतात – दुर्दैवामुळे येतात, घरभेद्यांच्या कारस्थानामुळे येतात तसेच नायकाच्या हट्टी नास्तीकातेमुळे देखील! शेवटी शेवटी दुर्द्रेवाची चरणसीमा गाठली जाते. प्रयत्न संपतात, उपाय संपतात, राहिलाच तर श्रद्धेचा मार्ग शिल्लक राहतो. पडद्यावर शरद तळवलकर ‘बाळ’ ला श्रद्धेचं महत्व समजावू लागतात, नायकाच्या मनावर कुठेतरी त्याचा परिणाम झाल्यासारखा दिसतो. प्रेक्षागृहातील श्रद्धाळू मने याच क्षणासाठी आसुसलेली असतात. तेंव्हाच… संवाद संपून शांतता पसरते. आणि त्या शांततेच्या पार्श्वभूमीवर अष्टविनायक स्तुती सुरु होते…
स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखं
मोरेश्वर: सिध्दिद: ।
बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे
चिंतामणीस्थेवरे ।।
लेण्याद्रौ गिरिजात्मक: सुवरदो
विघ्नेश्वरश्चोझरे ।
ग्रामे रांजणसंस्थितो गणपति:
कुर्यात सदा मंगलम ।।
क्वचितच एखाद्या गाण्याच्या सुरुवातीला एवढी चांगली वातावरणनिर्मिती केली गेली असेल. या गाण्यापुरत बोलायचं झालं तर, पूर्ण चित्रपट हा या गाण्याची वातावरणनिर्मिती आहे असं म्हंटल तरी ते चुकीचं होणार नाही. इथून पुढे सुरु होतं ते बाराएक मिनिटांचं, आठ कडव्यांचं अघळ पघळ गाणं!
वास्तविक एका गाण्यावर पूर्ण लेख लिहिला जावा अशी गाणी अभावानेच आढळतील – पण जी आहेत, त्या मध्ये या गाण्याचा समावेश करावाच लागेल. याचं कारण म्हणजे गाण्याच्या गीत-संगीताच्याच बरोबरीने केलेलं गाण्याचं सादरीकरण. एखादे गाणे चांगले जमून येण्यासाठी, गाण्याचे बोल, संगीत आणि गायक हे तीन कोन जुळून यावे लागतात. या तिन्ही पैकी एक जरी बिघडला, तरी पूर्ण गाणं बिघडतं. म्हणूनच चित्रपटसृष्टीत जिथे वर्षाकाठी हजाराच्या पटीत गाणी तयार होतात, तिथे वर्षाखेरीस टॉप – २० वगैरे ऐकण्याजोगी शिल्लक रहातात. जी गाणी या दिव्यातून पार होतात, त्यांची खरी परीक्षा येते ती त्या गाण्याच्या पडद्यावरील सादरीकरणाच्या वेळी. एवढ्या कष्टाने बसवलेली, जीव ओतून गायलेली गाणी… पण इथून पुढे केमेरामन, नृत्यदिग्दर्शक, खुद्द दिग्दर्शक आणि सर्वात म्हणजे नायक-नायिका यांच्या लहरीनुसार किंवा कुवतीनुसार त्यांचं भवितव्य ठरतं. उदाहरणार्थ ‘जैत रे जैत’ मधील ‘मी रात टाकली…’ हे गीत; ना. धों. महानोरांसारख्या कवीचे बोल, हृदयनाथ मंगेशकरांच संगीत, लता मंगेशकरांचा स्वर आणि स्मिता पाटील सारखी अद्वितीय अभिनेत्री … एवढ्या सगळ्या एकापेक्षा एक वरचढ बाजू असताना प्रत्यक्ष पडद्यावर काय दिसतं, तर एका ठिकाणाहून दुसरी कडे आणि दुसरी कडून तिसरी कडे चालत जाणारी स्मिता पाटील! तीच गत ‘फिटे अंधाराचे जाळे…’ ची. ऐकताना ऐकतच राहावीशी वाटणारी कित्येक गाणी ही पाहताना भ्रमनिरास करतात. म्हणून वाटतं मराठीतील अनेकानेक सुंदर भावगीते ही कधी चित्रबद्ध झाली नाहीत हे फार चांगलं झालं.
अर्थात या पार्श्वाभूमीवर, जिथे पडद्यावर एखाद्या गाण्याला पुरेपूर न्याय मिळत असेल, असं गाणं तर गाण्याचा आनंद द्विगुणीत, नव्हे शतगुणित करतं. ‘अष्टविनायका…’ हे गाणं इतर मराठी गाण्यांपेक्षा उजवं ठरतं ते याचसाठी. या गाण्यात आठ विनायाकांसाठी रचलेली आठ कडवी आहेत, ती कडवी साकारणाऱ्या महाराष्ट्र देशीच्या आठ वेगवेगळ्या लोकधारा आहेत आणि पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत त्यावेळेचे मराठीतील नामवंत कलाकार.
‘मिले सूर मेरा तुम्हारा’, ‘महाराष्ट्र अभिमान गीत’, ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘देखो शाम बडी दिवानी…’ इत्यादी गाण्यांच्या रांगेतील हे गीत – या गाण्यांच्या आधी आलेलं. दिग्दर्शक म्हणून राजदत्त यांच्या कल्पकतेच कौतुक वाटतं.आणि शेवटचे कौतुकाचे अधिकारी म्हणजे संगीतकार अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल – ज्यांनी आठ कडव्यांत आठ पारंपारिक चाली वापरल्या आणि त्या सर्वांना एकसलग एका गाण्यात ओवले!
image-courtsey: http://konkanexpress.files.wordpress.com/2011/03/ashtavinayak.jpg