
काळा राजा, पांढरा राजा
आजवर नेहरूंच्या प्रशंसेप्रीत्यर्थ जे लिहिले गेलं – अगदी शालेय साहित्यापासून – त्यामध्ये “नेहरू आंतरराष्ट्रीय दर्जाचे थोर मुत्सद्दी होते” यासारखे एखादे घाऊक वाक्य सोडले तर एरव्ही गुलाबाचे फूल, मुलांचे आवडते ‘चाचा नेहरू’, शांतीदूत यासारखी रंगरंगोटीच जास्ती असायची. तिकडे नेहरूंचे बरेचसे टीकाकार नेहरू-एडविना, नेहरूंचे खरे-खोटे शौक, नेहरू आणि शेख अब्दुल्ला असल्या आंबट गोष्टीच्या पलीकडे सहसा जात नाहीत.अगदीच वादाचे गांभीर्य राखू पाहणारे देखील… ‘नेहरूंमुळे निर्माण झालेला’ काश्मीर प्रश्न, नेहरूंनी ‘आणलेली’ घराणेशाही, नेहरूंनी चीन ला ‘दान केलेला’ तिबेट यांसारखे मुद्दे पुढे करतात – मात्र जास्ती तपशिलात न जाण्याची दक्षता घेतात. तेंव्हा एकीकडे वारेमाप कोडकौतुके करणारे उथळ प्रशंसक आणि दुसरीकडे चारित्र्यहननाच्या मार्गावर जाणारी टीका या दोन काठ्यांमध्ये बांधलेल्या तारेवर कसरत करीत स्वतंत्र भारताचा पहिला – आणि सर्वाधिक काळ काम पाहिलेला – पंतप्रधान आजच्या पिढीसमोर उभा आहे.
केवळ कोटाला गुलाब लावून, कबुतरे उडवून आणि देखण्या घरंदाज व्यक्तिमत्वाच्या जोरावर…. किंवा सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून, माउंटबेटन प्रभृतीं सोबत गुप्त संधान बांधून … एखादी व्यक्ती सलग तीन-चार दशके सदोदित यशाच्या, कीर्तीच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर कशी राहू शकते या प्रश्नाचे उत्तर मात्र दुर्दैवाने नेहरुवादाचे चाहते ही देत नाहीत आणि टीकाकार देखील देत नाहीत. याचं एक कारण असंही असावं की नेहरूवादाला स्वत:चा असा रंग नाही – असलाच तर तो भोवतालच्या आसमंताबरोबर आपले रंग जुळवून घेणाऱ्या प्राण्याप्रमाणे लवकर ओळखू येत नाही. सभोवतालच्या लोकांमध्ये परिस्थितीनुरूप तो बेमालूम मिसळून गेलेला असतो. सुभाषबाबूंसमवेत युवक कॉंग्रेसच्या व्यासपीठावर लगबगीने इकडे-तिकडे करणारे जवाहरलाल हे देशातील युवकांचे आशास्थान असतात… गांधीजींच्या बरोबर पदयात्रेत झपझप चालणारे खादी वस्त्रांकित नेहरू संपूर्ण स्वदेशी बनावटीचे सत्याग्रही असतात… डॉ आंबेडकरांबरोबर स्वतंत्र भारताच्या भावी घटनेची चर्चा करताना ते अर्थतज्ञ, कायदेतज्ञ असतात… आंतरराष्ट्रीय समुदायाला संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून संबोधित करताना ते आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी असतात. शांतिनिकेतन असो, आनंदभवन असो, ग्रामसभा असो किंवा व्हाईटहाउस असो – नेहरू चित्रात एकदम फिट्ट बसतात. हे जमण्यासाठी मनुष्य फक्त चौफेर चतुरस्त्र असून भागत नाही; त्यासाठी वेळ, प्रसंग आणि परिस्थितीनुसार क्षणोक्षणी धोरण बदलता येण्याचे अंगभूत चातुर्य असावे लागते. नेहरू संघाच्या राजकारणाचे आजीवन विरोधक असूनही ते संघाच्या स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाला राजपथावर संचालनासाठी पाचारण करू शकतात आणि ‘रशियाच्या गटातले’ अशी ओळख असून सुद्धा चीनच्या युद्धात रशियाआधी ते अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळवू शकतात. संधिसाधू म्हणावं तर जोडीला दूरदृष्टीही तेवढीच. म्हणूनच नेहरूंच्या राजकारणाला कुठल्याही एका ठोस तत्वाच्या किंवा सूत्राच्या आधारावर रंगवणे कठीण आहे.
दुर्दैवाने त्यांच्या राजकारणाचे बारकावे लोकांसमोर ताकदीने आणणारा तोलामोलाचा चरित्रकार नेहरुंना मिळाला नाही. आणि दुसरे दुर्दैव हे की त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवतील असे राजकीय वारसदार पण साठ वर्षांत पक्षाला लाभले नाहीत. अर्थात हे दुर्दैव नेहरुंपेक्षा काँग्रेस पक्षांचे. आज साठ वर्षे सत्तेत असूनदेखील पक्षाला काही स्वत:विषयी काही गौरवशाली बोलावेसे वाटले तर थेट नेहरुंपर्यंत मागे धावत यावे लागते. नेहरूंचा राजकीय वारसदार कोण या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस पेक्षा काँग्रेसेतर पंतप्रधानांमध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे. राजीव गांधी, पी व्ही नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांनी आपापल्या पद्धतीने देशाच्या उभारणीस हातभार लावला हे खरेच; पण या सर्वांपेक्षा देखील जर कुणाचे राजकारण नेहरुंच्या दूरदृष्टीला साजेसे असेल, जर नेहरूंच्या भविष्यातील भारताच्या स्वप्नाशी सुसंगत असेल तर ते म्हणजे भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी!
या वाक्याने नेहरूसमर्थक आणि मोदीसमर्थक, दोघांचाही भ्रमनिरास होईल.
पण “पंतप्रधान हे एका पक्षाचे पंतप्रधान नसून पूर्ण देशाचे पंतप्रधान असतात आणि त्या नात्याने ते आपल्या पूर्वसुरींचा वारसा पुढे चालवतच असतात”, हे पहिले राजकीय तत्व आहे – आणि दुर्द्रेवाने आजच्या बहुतेक राजकीय तत्वचिंतकांच्या कानी हे ओरडून सांगावं लागेल. व्यक्तिगत द्वेषाने आंधळे झालेल्या आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी असणाऱ्या लोकांना, ‘गांधी एकाचे, सावरकर दुसऱ्याचे’ म्हणताना; शेवटी गांधी-सावरकर हे एकाच भारतमाते साठी समान शत्रूविरुद्ध लढले आणि म्हणून कितीही परस्परविरोधी झाले तरी ते शेवटी कुठेतरी एकत्र येतातच, हे लक्षात घ्यायची इच्छा नसते. शेवटी निष्ठा गांधींशी की सावरकरांशी की भारतमातेशी हा खरा प्रश्न आहे. ज्याला देशाशी निष्ठा ठेवायची आहे त्याला गांधी, भगतसिंग, सुभाषबाबू, सावरकर… सगळ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे क्रमप्राप्त आहे.
ज्यांना नेहरू हे ब्रिटीश एजंट वाटतात किंवा मोदी हे आरएसएस चा छुपा अजेंडा (म्हणजे जे काय असेल ते) राबवत आहेत असे वाटते त्यांच्यासाठी हा लेख नाही. अशा लोकांचे वाद ज्या मुद्द्यांभोवती येऊन घुटमळतात त्याच्या एक पाउल पुढे हा लेख सुरु होतो. नेहरू आणि मोदी हे दोन्ही प्रखर राष्ट्रवादी आहेत, दोघांची अंतिम निष्ठा भारतमातेशी आहे ही इथे Bottom-line आहे. भविष्यातील प्रगत, श्रेष्ठ आत्मनिर्भर भारत हा दोघांचाही ध्यास आहे … इथे दोघांच्या समानतेला सुरुवात होते.
असा भविष्यातला भारत बनवण्यासाठी कशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घ्यावा याविषयी देखील दोघांच्या निश्चित कल्पना आहेत – आणि या कार्यक्रमात देखील दोन साम्यस्थळे विशेष लक्षात घेण्याजोगी. पहिली विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगांच्या विस्तारला सर्वाधिक प्राधान्य आणि दुसरी या कार्यक्रमास सुसंगत, पूरक ठरेल अशी आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका. नेहरू सार्वजनिक क्षेत्रात अनेकानेक संस्थांची पायाभरणी सुरु करतात – शिक्षण क्षेत्रात IIT, IISc, संशोधन क्षेत्रात BARC, ISRO, संरक्षणात HAL, DRDO, उद्योग क्षेत्रात BHEL, IOCL असा धडाका लावतात. सोबतीला तेंव्हा सुरु असलेल्या अमेरिका-रशियामधील शीतयुद्धाचा आपल्या देशाच्या अंतर्गत कार्यक्रमावर परिणाम होऊ नये म्हणून अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभारतात. इकडे मोदी सत्तेवर येताच Make-in-India, Startup India, Digital India अशी आतषबाजी सुरु करतात. सोबत जगभर दौरे करून आंतरराष्ट्रीय हितसंबंध प्रस्थापित करतात; आपल्या देशात सुरु केलेल्या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, गुंतवणूक, बाजारपेठ उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करतात.
२१ व्या शतकातला भारत हा तरुणांचा भारत आहे – देशोदेशी जाऊन आपल्या कर्तुत्वाने आपली आणि देशाची जगाला नवी ओळख घडवून आणणाऱ्या तरुणांचा भारत. सुंदर पिचाई, सत्या नादेला, इंद्रा नुयी, प्रणव मिस्त्री, शाहरुख खान हे या पिढीचे प्रतिनिधी. मोदींनी सुरु केलेली Start-up India सारखी योजना फक्त एक सरकारी योजना नाही; आधुनिक, तरुण भारताच्या महत्वाकांक्षांना, कर्तुत्वाला साद घालणारी ही योजना आहे. योग्य वेळी केलेली योग्य कृती म्हणून ती अभिनंदनास पात्र आहेच, पण या योजनेला एक महत्वाची पार्श्वभूमी आहे जी विसरून चालणार नाही. आज देश-परदेशात डॉक्टर-इंजिनिअर-शास्त्रज्ञ-व्यवस्थापक म्हणून नाव कमावणाऱ्या कित्येक तरुणांचे आई-वडील हे सरकारी शाळांत शिक्षक, वीज-टेलिफोन कंपनीत कर्मचारी, बँक-विमा कंपनीत अधिकारी म्हणून नोकरी करत होते. महिन्याच्या पगारात किराणा-घरभाडे, पैसे वाचवून मुलांचे शिक्षण-लग्न आणि रिटायरमेंट नंतर स्वत:चे एक घर एवढ्या मर्यादित चाकोरीमध्ये आयुष्य घालवलेली पिढी. मात्र एक शाश्वत नोकरी आणि जरी अल्प असेल तरी महिन्याला नियमितपणे होणारी कमाई एवढे स्थैर्य जर सरकारने एक-दोन पिढ्यांना पुरवले तर भावी पिढ्या कुठवर झेप घेऊ शकतात याचे आजचा भारत हे बोलके उदाहरण. म्हणून मोदींचे भारतीय तरुणाईच्या आकांक्षांना फुंकर घालण्याचे धोरणाची प्रशंसा करता करता… नेहरूंच्या स्थैर्य, रोजगार, सामाजिक न्याय यांना प्राधान्य देणाऱ्या धोरणाला विसरून चालणार नाही.
यामध्ये एक सलगता, एक सातत्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी मोदींना नेहरूंचे भजन करायची गरज नाही किंवा नेहरुंना देखील मोदींना आपला उत्तराधिकारी घोषित करायची गरज नाही – त्या सगळ्या राजकीय परीकथा झाल्या. राजकीय आखाड्यात परस्परांचे कट्टर विरोधक असून देखील जर नेते आपल्या जनतेच्या अशा-अकांशांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतील तर इच्छा असो व नसो ते एकाच पथावरील पांथस्थ बनतात!
नेहरूंच्यावर नेहमी नेभळटपणाचा, अतिशांतीप्रियतेचा आरोप केला जातो. नेहरूंचा ‘अलिप्ततावाद’ ही कविकल्पना आहे, त्यापायी शीतयुद्धात आपण अमेरिका किंवा रशिया पासून अंतर ठेवून आपण कसं स्वत:चं तेंव्हा नुकसान करून घेतलं वगैरे मौलिक ज्ञान देणारे तज्ञ भेटतच राहतात. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात कविकल्पनेचं देखील एक व्यावहारिक मूल्य असत. वस्तूच्या विक्रीमध्ये जे महत्व आकर्षक पॅकिंग ला तीच गोष्ट या तथाकथित रोमेंटिक आदर्शवादाची – खरं पहायचं ते त्यामागचं वास्तव. नेहरूंच्या अलिप्ततावादाला देखील असंच एक व्यावहारिक मूल्य आहे – ते म्हणजे भारत हा सर्वार्थाने जगापासून अलिप्त असा देश आहे ही वस्तुस्थिती. भौगोलिकदृष्ट्या आपण तीन बाजूनी समुद्र आणि एका बाजूने हिमालय असे जगापासून अलग आहोत. त्यामुळे काही देशांना फक्त त्यांच्या मोक्याच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात जे महत्व प्राप्त होतं ते आपल्याला नाही. आपल्याकडे कुठल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा – जसे तेल, युरेनियम – साठा नाही , त्यामुळे या दृष्टीनेही कुठल्या महासत्तेला आपल्यामध्ये इंटरेस्ट असण्याचं कारण नाही. तिसरे म्हणजे भारत हा राजकीयदृष्ट्या हिंदू बहुसंख्येचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू देश आहे – त्यामुळे धार्मिक आधारांवर जी राष्ट्रे गट करून राहतात तशीही शक्यता भारताच्या बाबतीत नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन देशांमध्ये दीर्घकालीन मैत्रीसंबंध झालेच तर ते वांशिक, भौगोलिक, धार्मिक आधारावरच होतात – एरव्ही सगळे व्यवहार हे कारणपरत्वे, तात्पुरत्या हितसंबंधासाठीच जमतात.
जो देश भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जगापासून अलिप्त आहे, त्या देशासाठी स्वत:च्या उभारणीसाठी दीर्घकाळ अमेरिका किंवा रशियाच्या मदतीवर विसंबून राहणे शक्य नाही; इतर सर्व गोष्टींना दुय्यम प्राधान्य देऊन लवकरात लवकर आत्मनिर्भर होणे हाच देशापुढील कार्यक्रम असला पाहिजे ही दूरदृष्टी नेहरुंना होती. चीन-पाकिस्तान सारख्या शेजारी राष्ट्रांशी लष्करी स्पर्धा केल्याने उद्योगांच्या उभारणीवर, देशाच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होतो; ही स्पर्धा सुरु करणे आपल्या हातात असते, थांबवणे नसते. उलट अशा लष्करी स्पर्धांमधून लोकशाही जाऊन हुकुमशाही येण्याचा संबंध असतो. म्हणून हे प्रश्न होता होईल तो टाळावे, किमानपक्षी जमतील तितके पुढे ढकलावे ही त्यांची शेजारी राष्ट्रांप्रती भूमिका होती. त्यात त्यांना यश आले नाही ही गोष्ट खरी. पण जवळ दाम नाही, शेजारी राष्ट्रांना दंड करावा एवढी शक्ती नाही, आणि भेद करावा अशी परिस्थिती नाही … मग राहिला फक्त साम! शांततामय सहजीवन, पंचशील वगैरेचा उद्घोष त्यासाठी.
आज नेहरूंनंतर ५० वर्षांनी या परिस्थतीत फारसा बदल घडला आहे असे नाही – आणि एखाद्या राष्ट्राच्या वाटचालीत ५० वर्षे हा काही खूप मोठा कालावधीदेखील मानला जात नाही. मात्र भारताने नेहरूंनी तेंव्हा घालून दिलेला परराष्ट्रीय धोरणाचा ढाचा आजदेखील तसाच ठेवला आहे हे लक्षात घेण्याजोगे! मधल्या काळात एक महत्वाचा बदल घडला आहे तो म्हणजे जागतिकीकरण. गेल्या दोन दशकात हे एक नवीनच परिमाण जगाला लाभले, जग अधिकाधिक जवळ आले – आणि टप्प्याटप्प्याने भारताची भूमिका ही जगाला मनुष्यबळाचा पुरवठा करणारा देश अशी होऊ लागली आहे. ज्या देशात आजवर परकीयांनी येऊन वसाहती थाटल्या, त्या देशाचे लोक आता ओस्ट्रेलिया पासून केनडा पर्यंत (नकाशा चौकोनी धरला असता!) स्वत:चे पाय रोवू लागले आहेत. भविष्यात हा वेग वाढण्याचीच शक्यता आहे. आतापर्यंत भारताला वांशिक-सांस्कृतिक साथी नव्हता, पण भविष्यात परदेशात मोठ्या संख्येने स्थायिक होणारे अनिवासी भारतीय हेच भारताचे साथीदार बनतील. इस्रायेल ला ज्याप्रमाणे जगभर विखुरलेल्या ज्यूंची मदत मिळते, तीच गोष्ट भविष्यात भारताची पण होईल. मोदी ज्या-ज्या देशाला भेट देतात तिथल्या भारतीयांची आवर्जून भेट घेतात… जगाच्या पाठीवर कुठेही स्थायिक झाले तरी “आपण भारतीय आहोत याचा विसर पडू न देणे” हे भारतासारख्या आजवर या न त्या कारणाने ‘अलिप्त’ राहिलेल्या देशाला अत्यंत महत्वाचे आहे. सरदार पटेल म्हणत पंडितजी आज जे करतात त्याचे परिणाम ५० वर्षांनी दिसतात… मोदींच्या आजच्या उपक्रमाचे फलित देखील कदाचित ५० वर्षांनी दिसेल.
2 Responses to काळा राजा, पांढरा राजा