Published on April 14th, 2016 | by Sandeep Patil
0प्रवेश की घुसखोरी
गेले काही दिवस कुणी एक ‘तृप्ती देसाई’ नामक उचापतखोर महिला ‘मंदिर प्रवेश’ या गोंडस नावाखाली सामाजिक वातावरण पद्धतशीरपणे बिघडवण्याचे काम करत आहे. हिंदू समाज म्हणजे सोशिक समाज – चार वेळा समोरच्याचं म्हणणं ऐकून घेऊन मग एकदा बोलणारा – सहिष्णू परंपरेनेच त्याला तसं सोशिक वळण लावलं आहे. कुणी देव-देवतांची चित्रे काढा, व्यंगचित्रे काढा किंवा श्रुती-पुराणांची खिल्ली उडवा , इतिहास पाहिजे तसा वाकवा – विशेष कुरकुर न करता सगळ्याशी होता होईतो जमवून घेणारा असा हा समाज. त्यामुळे जर कुठल्या उमेदवार समाजसुधारकाला धर्म-सुधारणेच्या प्रांतात बागडण्याची हुक्की आली तर त्याला हिंदू धर्मासारखे कुरण शोधून मिळणार नाही – धर्मात दोष आहेत म्हणून नव्हे, पण विशेष विरोध होत नाही, उलट विरोध करणाऱ्याला प्रतिगामी वगैरे ठरवण्याची पुरेशी सोय आहे म्हणून. त्याचाच पुरेपूर फायदा घेत देसाईबाईंनी शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर इ. ठिकाणी काही धर्मसुधारणा (?) घडवून आणल्या आणि त्या पाठोपाठ त्यांची पावले कोल्हापूरच्या दिशेने पडली.
करवीर निवासिनी महालक्ष्मी हे समस्त कोल्हापूरकरांच्या श्रद्धेचं आणि जिव्हाळ्याचं स्थान – गावात अर्ध्या अधिक दुकानांची नावं महालक्ष्मी नाहीतर अंबा-अंबाबाई अशीच दिसतील. आणि देवीवरची श्रद्धा फ़क़्त हिंदूपुरती नाही; दर मंगळवारी-शुक्रवारी देवीच्या रांगेत कित्येकदा मला माझे इतरधर्मीय मित्र, शिक्षक वगैरे भेटलेले आहेत. ‘हे’ देवीच्या रांगेत कसे असा प्रश्नही कधी मनाला शिवला नाही. सांगायचा मुद्दा असा की ज्या मंदिराच्या प्रांगणात वर्षानुवर्षे एवढा धार्मिक सलोखा नांदतो आहे तिथे कुठल्या तरी गर्भ-गृहातील प्रवेश वगैरे तद्दन निरुपयोगी, टुकार मुद्द्यावर वातावरण तापवून देसाईबाईंनी काय साधले हे त्यांनाच ठावूक!
मी लहानपणापासून अंबाबाईच्या देवळात जात आहे – सर्वांना देवीच्या दर्शनाचे सारखेच नियम आहेत. गर्भगृहात अपवादानेच एखाद्याला प्रवेश मिळतो आणि तो पण सोवळ्यात. गाभाऱ्यात स्त्रियांना नव्हताच असं ठामपणे सांगणे अवघड आहे – पण जरी ते गृहीत धरलं तरी देखील देवस्थान समितीने दोन दिवस आधीच हे स्पष्ट केलं होते की स्त्रियांना गर्भगृहात प्रवेश मिळेल. त्यामुळे तो मुद्दा पण निकालात निघाला. मग स्त्रियांचा कसला समान हक्क नाकारला? पण आता स्त्रियांनी एखादी गोष्ट डीट्टो पुरुषांसारखी करून दाखवणे एवढा साधा-सोपा आणि उथळ अर्थ स्त्री-पुरुष समानतेला प्राप्त झाला आहे. एरव्ही ते देऊळ आदिशक्तीचे आहे – तिथे शतकानुशतके स्त्रीच्या शक्तीरुपाची पूजा होते आहे – एवढा किमान विवेक तरी देसाई प्रभृतींकडे हवा होता.
अर्थात तृप्ती देसाईंच्या शब्दकोषात ‘विवेक’ वगैरे शब्द कितपत असतील या विषयी मी साशंकच आहे. अन्यथा धर्मपरंपरा या शेकडोंच्या धर्मभावनेशी निगडीत असतात – त्या खूप हळुवारपणे, टप्याटप्याने बदलाव्या लागतात याची जाणीव समाजसुधारणेची स्वप्ने पाहणाऱ्याला असलीच पाहिजे. धर्माच्या क्षेत्रात आंदोलने हा प्रश्न सोडवण्याचा शेवटचा पर्याय आहे, पहिला नव्हे.
इकडे आम आदमी पार्टी चा दिल्लीतील प्रयोग यशस्वी झाल्यापासून आंदोलनांची डिमांड भलतीच वाढली. एकवेळ प्रश्न नसला तर चालेल पण आंदोलन हे दणकून झालेच पाहिजे. देसाई आणि इतर समाजसेवी पिलावळ ही असाच आंदोलनाचा फॉर्म्युला वापरून झटपट काही यश मिळतंय काय या खटपटीत असलेली. त्यामुळे देवस्थानाने महिलांना प्रवेशाचा हक्क दिला तर आता मी साडी न नेसता चुडीदारच नेसून गाभाऱ्यात जाणार असा नवा आडमुठा पवित्रा देसाईंनी घेतला. विचार आणि समज याबाबतीत देसाईंशी तुलना होईल अशा काही मनोरंजक लोकांनी याला ‘ड्रेस कोड’ असं कार्पोरेट नाव दिले आहे – मात्र सोवळे, वस्त्र आदी गोष्टींचा पावित्र्य, शुचिता, मांगल्य यांसारख्या इंग्रजी प्रतिशब्द नसलेल्या गोष्टींशी संबंध आहे हे त्यांना कोण सांगणार. शिवाय देसाईबाईंचा भरोसा नाही – त्या आज स्वत:च्या कपड्यांबद्दल हट्ट करत आहेत, उद्या मी येईन तेंव्हा देवीने हाच पोशाख घालून तयार राहिलं पाहिजे नाहीतर स्त्रीचं आपल्या आवडत्या रुपात देवीला पाहण्याचं स्वातंत्र्य पुरुषप्रधान हिंदू संस्कृतीने हिरावून घेतलं आहेत म्हणून देखील त्या आंदोलन करायच्या. एकदा कुरापत काढायची ठरवली की मग काय.
आणि फक्त कुरापत काढूनच देसाई थांबल्या नाहीत, देवीच्या दारात तास-दोन तास गोंधळ घालून शेवटी पोलिसांच्या मदतीने त्यांनी पुजाऱ्याना बाजूला सारून त्यांनी गाभाऱ्यात पण घुसखोरी केली म्हणे. या पूर्ण घटनाक्रमात ही घुसखोरीच महत्वाची आहे (याला ‘प्रवेश’ तर नक्कीच म्हणता येणार नाही). याला फ़क़्त खोडसाळपणा किंवा आडमुठेपणा म्हणून भागणार नाही – नकळतपणे या घटना भाविकांच्या श्रद्धेवर आघात करतात. गाभाऱ्यात देवीचा वसते आहे, तिच्या बाजूला मंद-मंगल दीप तेवत आहेत, त्या पवित्र गर्भगृहात केवळ सोवळे नेसलेल्या शुचित सेवकालाच प्रवेश आहे या सारख्या अनेक व्यक्तअव्यक्त भावनांनी भरलेल्या मन:चित्राला अशा घटनांनी तडा जातो. मंदिर ‘प्रवेशा’च्या छुल्लक वाटणाऱ्या घटनेला सामान्य भाविकांनी कडाडून विरोध केला तो त्या भावनेपोटी.