Published on August 27th, 2015 | by Sandeep Patil
4“महाराष्ट्रभूषण”च्या निमित्ताने
“महाराष्ट्रभूषण पुरस्कार श्री बाबासाहेब पुरंदरेंना देण्यावरून सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे “, अशा अर्थाची प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांत जागोजागी ऐकायला मिळत होती. वाद दुर्दैवी आहे ही गोष्ट तर खरीच, मात्र फ़क़्त “दुर्दैवी” म्हणून विषय संपत नाही. “दुर्दैवी” घटना वारंवार होऊ लागल्या की त्यांच्या पलीकडे जाऊन विचार करणे भाग पडते. मला स्वत:ला थोडा खोलवर विचार करता असं वाटते की वरकरणी या घटना तेवढ्या दुर्दैवी वाटल्या तरी त्या एक प्रकारे बदलणारी सामाजिक स्थित्यंतरे दर्शवितात. स्थित्यंतरे चांगली असतात, वाईट असतात … पण ती होतंच असतात आणि होतंच राहतात.
पुरंदरे प्रकरणाला पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची. हा वाद काही फार मोठा कडवा वाद म्हणून ओळखला जात नाही , यातून काही जन्माची वैरे वगैरे तयार झालेली नाहीत. मात्र पूर्वी सिलोन स्टेशन वर जशी गाण्याबरोबर सदोदित एक खरखर ऐकू यायची तशी या वादाची एक अविरत खरखर सदैव सुरू असते. या वादाचे स्वरूप वेळोवेळी बदलत गेले – कधी उघड संघर्ष, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी… कधी छुपी स्पर्धा आणि वर्चस्वाची चढाओढ तर कधी मैत्रीपूर्ण, गमतीदार लढती. काहीसा कडूगोड, बराचसा निरुपद्रवी असे वर्षानुवर्षे या वादाचे सर्वंकष स्वरूप राहिले आहे.
महाराष्ट्रभूषण पुरस्कार पुरंदरेंना देण्याच्या निमित्ताने झालेले राजकारण म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातील ताजे प्रकरण! या वेळी पुरांदारेंवर जे काही उथळ, प्रसंगी स्वत:वरच उलटणारे आणि स्वत:चे हसे करून घेणारे आरोप झाले, त्यावरून या वादाचे सद्य स्वरूप समजण्यास मदत व्हावी. एरव्ही गांभीर्याने जाणारा, बरीचशी तात्विक बैठक असणारा महाराष्ट्राच्या समाजकारणातील एक महत्वाचा असा हा वाद; एकाएकी एवढा विक्षिप्त, बालिश आणि बीभत्स का झाला? यासंदर्भात दोन-तीन मुद्दे महत्वाचे आहेत – पहिली म्हणजे या वादाचे नेतृत्व… दुसरे म्हणजे या वादाचे स्वरूप आणि तिसरी म्हणजे या सर्व वादाला छ. शिवाजी महाराजांच्या दारी नेवून उभा करण्याचा प्रयत्न! (हे तिन्ही मुद्दे त्रिकोणाच्या कोना प्रमाणे आहेत, त्यामुळे कुठूनही सुरुवात करून परत फिरून सुरुवातीच्या मुद्द्यावर परत येऊ शकतो!)
नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर … शंभरेक वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती कि याच वादात कुणाचीही कड घेतली तरी दोन्ही बाजूच्या नेतृत्वापुढे आदराने नतमस्तक व्हावे! लोकमान्य टिळक, छ. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, आगरकर, धोंडो केशव कर्वे, न्या. रानडे, न. चि. केळकर अशी एका पेक्षा एक दिग्गज मंडळी तेंव्हा समाजकारण करत होती. एकापेक्षा एक प्रखर बुद्धिमान, व्यासंगी, प्रतिभावंत लोक, ज्यांच्या कार्याचा भग्वद्गीतेपासून राज्यघटनेपर्यंत दरारा होता आणि राज्यसिंहासनापासून शेतकऱ्याच्या झोपडीपर्यंत कार्यक्षेत्र पसरलं होतं! त्यांचे ज्ञान, व्यासंग, बुद्धिमत्ता जेवढी उजवी होती तेवढीच त्यांची कळकळ देखील सच्ची होती. त्यामुळे परस्परविरोधी टीका ही पातळी सोडून केली गेली नाही. उगीचच कधीपण इकडची मंडळी तिकडे जाऊन कार्यालयाची मोडतोड-नासधूस करून आली नाहीत! कुठलाही पक्ष आपला मुद्दा पटवून देताना समर्थनार्थ योग्य ते पुरावे, संदर्भ किंवा उदाहरणे देण्याची काळजी घेई. त्यामुळे वादाचे गांभीर्य आणि औचित्य राखले गेले.
सध्या या सर्व वादाचे स्वरूप केवढे ओंगळ झाले आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही – त्याची जबाबदारी तर त्या-त्या नेतृत्वाला घ्यावीच लागेल. पण या सर्वांपेक्षा एक अत्यंत महत्वाचा फ़रक़ हा जुन्या आणि विद्यमान नेतृत्वा मध्ये आहे (आणि हा फरक फक्त ब्राह्मण-ब्राह्मणेतर पुरता नाही – त्या ऐवजी दलित-सवर्ण, भूमिपुत्र-उपरे असा कुठलाही मुद्दा चालेल). तो म्हणजे नेत्यांनी चळवळीचा स्वत:च्या स्वार्थासाठी केलेला उपयोग! चळवळीच्या निधीतून टिळकांनी स्वत:साठी गाडी घेतली किंवा महात्मा फुल्यांनी फार्म हाउस बांधले अशी उदाहरणे आपल्याला वाचायला मिळत नाहीत. उलट शाहू महाराजांनी पदरचे घालून लोकांची कामे केली. पण यामध्ये स्वत:चा फायदा हा मुद्दा तुलनेने गौण आहे; जर लोकांच्या कल्याणाच्या चार गोष्टी करून नेत्याने त्याबरोबर थोडा स्वत:चा स्वार्थ साधला तरी आज लोक खुश होतील अशी परिस्थिती आहे. पण खरा मुद्दा आहे तो स्वत:च्या फायद्यासाठी लोकांचे-चळवळीचे नुकसान करण्याचा!!
आजचे बरेचसे नेते वंशपरंपरेने नेते बनले आहेत, काही चमचेगिरी करून, काही गुंडगिरी करून. लोकांचे प्रश्न सोडवून स्वकर्तुत्वाने नेतेपद मिळवलेले कमीच. नेतृत्व समाजातून आलेले नसले कि लोकांचे प्रश्न त्रयस्थ पणे पहिलेले असतात, कधी जगले-अनुभवलेले नसतात. महात्मा गांधीना जसे रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढले किंवा डॉ अम्बेडकरांना जसा म्युनिसिपालिटी च्या दिव्याखाली अभ्यास करावा लागला तसे नामुष्कीचे प्रसंग आलेले नसतात. त्यामुळे तसे सामान्य लोकांच्या व्यथा अंगी भिनत नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जेंव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेंव्हा ती त्यांची वैयक्तिक मजबुरी नव्हती, तर ज्या समाजाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले होते त्या दलित समाजाची अगतिकता होती. नेता आपल्या अनुयायांशी एकरूप झाल्याचे हे उदाहरण आहे.
आजच्या नेत्यांची अपयशाची पहिली पायरी म्हणजे ते आपल्या लोकांशी अंतर ठेवून राहतात. आणि पुढची पायरी म्हणजे ते पर्यायाने नेते न राहता तारणहार बनायचा प्रयत्न करतात. मग दर ५ वर्षांनी खैरात वाटल्याप्रमाणे कर्जमाफी किंवा आरक्षण वाटावे लागते. दहीहंडी, गणपती, फुटबॉल या निमित्ताने स्पर्धा वगैरे आयोजित करून थोडी चिल्लर उधळावी लागते. आणि दुसऱ्या बाजूने लोकांना पण आशेवर रहायची सवय लावावी लागते. कर्तुत्वापेक्षा सवलत मोठी हा संदेश सारखा लोकांच्या मनावर बिम्बवावा लागतो. आज भारतात जागोजागी आरक्षणाची मागणी करत आंदोलने होत आहेत हा निव्वळ योगायोग नाही. लोकांबरोबर बसून भाकरी मोडून खाणारे नेतृत्व जसे फ्लेक्सबोर्ड वर जाऊन पोहोचले तसे त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अशा नेत्यांची वैयक्तिक प्रगती होईल ती होवो, पण त्यांच्या पाठराख्या समाजाची प्रगती होत नाही हे निश्चित.
इथून पुढे सुरु होते अपयशाची तिसरी पायरी – जसजसा समाज प्रगतीपासून दूर जाऊ लागतो, जशी समाजासमोरील विवंचना वाढू लागतात तशा नेत्यांच्या अडचणीत भर पडू लागते. लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाब विचारू लागतात. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिम्मत नसते आणि कारणांचा विचार करावा तर तेवढी कुवत नसते. अशा वेळी जबाबदारीतून निसटून जाण्याचा राजमार्ग म्हणजे दुसऱ्याकुणाकडे तरी बोट दाखवणे. मग बहुजन वाल्यांनी ते ब्राह्मणानकडे दाखवावं, राष्ट्राभिमानी लोकांनी इंग्रजांकडे, मराठी अस्मिता वाल्यांनी परप्रांतीयांकडे! या आरोपांमध्ये तथ्य नसतेच असे नाही, उलटपक्षी बर्याच वेळा तथ्य असते. पण फ़क़्त समोरच्यावर आरोप करून काही होत नाही, सोबतीला स्वत:चे म्हणून देखील काही कर्तुत्व लागते.
लोकांना देखील शक्यतो आपल्या दुरवस्थेला कोणीतरी दुसराच – वशिला, नशीब, पूर्वकर्म इ.- जबाबदार आहे हा सिद्धांत सहज पचनी पडतो. पहिल्या महायुद्धात जर्मनी चा पराभव झाला, सरकारची आर्थिक धोरणे चुकीची पडली , त्यातच जागतिक मंदी आली त्यामुळे महागाई पराकोटीची वाढली. त्याच वेळी रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाली. हिटलर ने या सर्वासाठी ‘ज्यू’ लोकांना जबाबदार धरले. ज्यू महागाई ला जबाबदार आहेत आणि रशियन राज्यक्रांती मागे पण त्यांचाच हात आहे, हळू हळू ते सारा युरोप गिळून टाकतील असा प्रचार केला. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे. तेंव्हा आपल्या दु:खांना दुसर्यांना जबाबदार धरण्याची वृत्ती हा समाजमानसशास्त्राचा एक भाग आहे. आणि आपल्या दु:खाला कोणी जरी जबाबदार असले तरी आपल्या कल्याणासाठी स्वत:च काहीतरी करणे आवश्यक आहे हा विचार बळावूपर्यंत कितीतरी वेळ निघून गेलेला असतो. आज बिहार, बंगाल, मध्य-प्रदेश सारखी राज्ये हळहळू जागी होऊ लागली आहेत पण त्या पूर्वी त्यांनी २०-२० वर्षांच्या जुलमी राजवटी भोगल्या आहेत … त्या देखील गरीबाच्या कल्याणाच्या नावाखाली! एकदा का नेतृत्वाने काही विधायक कार्यक्रम करायचे सोडून फक्त इकडे तिकडे लहरीप्रमाणे आरोप करायला सुरवात केली कि त्याचा कार्यभाग बुडाला म्हणून समजावे.
आता त्रिकोणाची दुसरी बाजू म्हणजे या वादाचे सद्य स्वरूप. गम्मत म्हणजे पूर्वीच्या काळी हा वाद चांगला ऐन भरात असूनसुद्धा त्यात “महाराजांचे गुरु संत रामदास की तुकाराम”, “महाराजांच्या सुरुवातीच्या काळात दादोजी कोंडदेवांचे महत्व” किंवा “महाराजांच्या अखेरच्या काळातील “ब्राह्मण” मंत्र्यांचे षड्यंत्र” यासारखे मुद्दे विशेषकरून चर्चिले गेले नाहीत. किमानपक्षी ते वादाच्या केंद्रस्थानी निश्चितच नव्हते. त्याउलट या वादाचे स्वरूप हे “समाजरचनेतील वेग-वेगळ्या समाजघटकांचे काय स्थान असावे… जे शोषित हक्काच्या गोष्टींपासून वंचित आहेत त्यांना त्या कशा प्रकारे प्राप्त व्हाव्यात” अशा प्रकारचे होते. मग गेल्या शंभरेक वर्षात या मूळ प्रश्नांना मागे टाकून हे द्वितीयक प्रश्न का पुढे आले?
समाज हा जातींवर आधारलेला असतो आणि जाती या व्यवसायावर! कोणतीही जात-पोटजात जेवढी व्यवसायाशी निगडीत आहे तेवढी इतर कशाशीही नाही. जातीला एकत्र बांधणाऱ्या परंपरा. चालीरीती वगैरे असतात; पण या चालीरीती देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यवसायाच्या अनुषंगानेच तयार झालेल्या असतात. कालानुरूप जे बदल समाजात होतात ते व्यवसायाच्या अनुषंगाने जास्त होतात, जातीच्या नव्हे. जे आंतरजातीय विवाह होतात त्यातील बरेचसे विवाह हा समान व्यवसाय असलेल्या लोकांमध्ये – म्हणजे डॉक्टर-डॉक्टर, वकील-वकील, सोफ्टवेअर-एच.आर. – इत्यादीमध्ये होतात. आता वाढदिवस, बरसे, मुंज, लग्न वगैरे विकेंड ला ठेवायच्या पद्धती वाढत आहेत. आज ज्या पद्धती आहेत त्या हळूहळू प्रथा, परंपरा बनतात. हे सगळे होत असताना जुन्या जाती आणि त्यांच्या परंपरा मोडीत निघत असतात. आजच्या काळात हा परंपरा मोडीत निघण्याचा वेग कधी नव्हे एवढा जास्त आहे. याचं पहिलं कारण म्हणजे जागतिकीकरणाच्या जमान्यात वेगाने जवळ येत असणारं जग. जुने व्यवसाय कालबाह्य होत आहेत त्यांच्या जागी नवीन पेशांनी घेतली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या वेगाने बदलणाऱ्या जगात कोणावर कोणत्याही पेशाच बंधन नाही. आता ‘इतर मागास’ म्हणून संबोधला गेलेला मनुष्य देशाचा पंतप्रधान देखील बनू शकतो, त्या साठी राजकुळात जन्म घ्यायची गरज नाही.
या सर्वांनी घाला घातला आहे तो जन्माबरोबर निगडीत असणार्या जातींच्या आणि त्याबरोबर आलेल्या उच्च-नीचतेच्या संकल्पनेवर. आणि त्यामुळे सगळ्यात जास्ती अडचण झाली आहे ती जातीच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांची. मोबाईल आल्यावर जसे STD-ISD चे दुकान चालवणार्यांची पंचाईत झाली तीच परिस्थिती जातींच्या दुकानदारांची होऊ लागली आहे. जात आहे, पण जातीच्या अस्तित्वाचे प्रयोजनच काळाबरोबर बदलत चालले आहे अशी काहीतरी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जातीच्या नावाने राजकारण करायचं तर त्या साठी जाती-सापेक्ष मुद्दा तरी मिळायला हवा. वर्तमानात तो मिळायची शक्यता कमीच, म्हणून मग त्या साठी इतिहासात घुसायच.
आणि इतिहासात घुसायाचच म्हंटल तर भावनेचं राजकारण करण्यासाठी शिवछत्रपतीइतका चांगला विषय दुसरा कुठला मिळणार. एरव्ही महाराजांच राजकारण हे इतद्देशियांसाठीच होतं – त्यांच्या सर्व जनतेसाठी होतं … आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर तर नव्हतंच नव्हतं. पण सध्या राजकीय पक्षांनी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काही करण्या ऐवजी, महाराजांचं जीवनकार्य च पक्षाच्या कार्यक्रमाला धरून बदलण्याचा जमाना आहे. जसे अफझलखानवधाचा विषय काढला की देशाचं निधर्मीपण धोक्यात येतं. (स्वत: अफझलखानाने तुळजाभवानीला उपद्रव केला होता हा मुद्दा विसरायचा). महाराज बहुजन समाजाचे राजे होते. (फक्त ‘बहुजन समाज’ हा शब्द मागाहून आला). दादोजी कोंडदेव महाराजांचे मुख्य कारभारी वगैरे कोणीच नव्हते (पण मग महाराजांनी बालवयात राज्यकारभार, करवसुली, न्यायनिवाडा, पत्रव्यवहार इ. गोष्टीचं शिक्षण कुणाकडून घेतलं? लहानवयात राज्यकारभाराची ओळख करून द्यायला कुणीतरी लागतंच ना) असो. पण असे प्रश्न विचारण्यात काही हशील नाही. जे लोक हजार पानांच्या पुस्तकातून ३-४ वाक्ये शोधून काढून त्यांचा वकिली कीस काढून त्यातून काही विपर्यास करून आदळआपट करतात , त्यांच्याकडून यापेक्षा दुसरी काय अपेक्षा ठेवणार.
या सर्व संघर्षामध्ये बाबासाहेब पुरांदारेन्सारख्या वयोवृद्ध एवं आदरणीय व्यक्तीला अनाठायी नको ते ऐकून घ्यावं लागलं याचा खेद होतो. एरव्ही (with due respect) “महाराष्ट्रभूषण” दरवर्षी बनत राहतील, “शिवशाहीर” क्वचित विरळा!
4 Responses to “महाराष्ट्रभूषण”च्या निमित्ताने