Published on May 22nd, 2014 | by Sandeep Patil
मदर टंग
ब्लॉग लिहायला सुरवात केल्यापासून मराठी मध्ये काहीतरी लिहायची इच्छा होती. तसं पण गेल्या १०-१५ वर्षात (मी महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे) मनसोक्त मराठी बोलायला किंवा लिहायला फारसं मिळत नाही. कुठल्या विषयावर लिहावं याचा विचार करत होतो – वाटलं मातृभाषेसंबंधी काहीतरी लिहावं. आता असं झालं आहे, की त्याच त्याच बातम्या आणि लेख वाचून डोक्यात काही जोडशब्द पक्के बसले आहेत. ‘महापालिका’ वाचलं की ‘घोडेबाजार’ आठवतो, ‘शेतकरी’ वाचलं कि ‘आत्महत्या’ , ‘विदर्भ’ शब्द आला कि लगेच ‘अनुशेष भरून काढणे’ हे वाक्य पाठोपाठ डोक्यात येते. तसं ‘मातृभाषा’ म्हंटल्यावर ‘मुलांचे शिक्षण मातृभाषेतून व्हावे का’ हा विषय पटकन डोक्यात आला.
वास्तविक, ‘मुलांचे शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे का?’ या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर ‘होय’ असे आहे. काही प्रश्न मुळातच इतके सहज आणि सोपे असतात कि त्यांची उत्तरे देताना तर्क लढवणे आणि मीमांसा करणे हे जास्ती किचकट असते. तसाच हा एक प्रश्न! उद्या जर कुणी म्हणाला की ‘लहान बाळाचे संगोपन त्याच्या आईने न करता एखाद्या उच्चशिक्षित, प्रशिक्षित दाईने करावे’ तर त्याला काय आणि किती समजावणार. फार तर फार आपण असं म्हणू की, बाळाचे संगोपन त्याच्या आईने करणे ही सर्वात नैसर्गिक, सर्वात मुलभूत गोष्ट आहे – म्हणून अशा गोष्टींना स्पष्टीकरण देता येत नाही. तीच गोष्ट मातृभाषेची – मुलांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून होणे ही एक अत्यंत मुलभूत गरज आहे, आणि यापेक्षा दुसरे योग्य कारण यासाठी असूच शकत नाही. पण सध्या एकूणच एक समाज म्हणून आपण कुठल्याही गोष्टीचा मुलभूत विचार करणे जवळपास सोडून दिले आहे. त्या ऐवजी आपण जाहिरातबाजीला भुलून म्हणा, किंवा इतर लोक करतात म्हणून म्हणा, किंवा एखादी गोष्ट आधुनिक आहे आणि म्हणून चांगली आहे असा समज बाळगून – पण एखाद्या महत्वाच्या विषयावर सारासार विचार न करता निर्णय घेतो. त्यातून मग हे असे नवीन, अप्रस्तुत प्रश्न उपटतात.
मी या संदर्भात बऱ्याच पालकांना विचारलं (ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात), की इंग्रजी माध्यम कशा साठी? त्यांच्या उत्तरातून विशेष काही हाती लागलं नाही. ‘आजकाल इंग्रजी शिवाय चालत नाही’, ‘आता स्पर्धेचं युग आहे, आपण काळाबरोबर राहिलं पाहिजे’ वगैरे मोघम उत्तरे मिळाली. त्यातल्या त्यात थोडाफार तथ्यांश असलेलं उत्तर म्हणजे ‘उच्चशिक्षण हे इंग्रजीतच घ्यावं लागतं, त्यामुळे पहिल्यापासूनच मुलांना इंग्रजीमध्ये शिकवलेलं चांगलं’. मी स्वत: इंग्रजीचं महत्व नाकारत नाही. एकतर सध्याची जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचं महत्व आहेच. शिवाय दुर्दैवाने आपल्याकडे मेडिकल, इंजिनिअरींग असो किंवा हॉटेल मॅनेजमेंट असो – उच्चशिक्षण हे बहुतांशी इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे. पण म्हणून इंग्रजी माध्यमातून मुलांना पहिल्या पासून शिकवणं हा त्यावर उपाय नव्हे.
विषय आणि माध्यम
प्राथमिक शिक्षणाच्या संकल्पनेत दोन महत्वाचे भाग आहेत. पहिला विषय, म्हणजे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी, आणि दुसरा माध्यम, म्हणजे आपल्या सोयीची भाषा – मराठी, इंग्रजी किंवा इतर कोणतीही – जिच्याद्वारे आपण हे विषय शिकतो. थोडक्यात माध्यम हा एक मार्ग आहे, विषयापर्यंत पोहोचण्याचा. हा मार्ग जेवढा सोपा, जेवढा सरळ आणि सशक्त तेवढे विषयांच्या पर्यंत पोहोचणे सोपे. याच साठी शाळांमधून मातृभाषा वापरण्याचा अलिखित नियम आहे. आता जर कोणी म्हणत असेल की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे मुलांचे इंग्रजी सुधारेल – तर त्याचा अर्थ असा झाला कि आपण आपले इंग्रजी सुधारण्यासाठी गणित, विज्ञान इत्यादी विषय शिकत आहोत. माध्यम हे विषय शिकण्यासाठी आहे, की विषय हे माध्यम समजण्यासाठी आहेत??? टेलीफोन एक उत्कृष्ट माध्यम आहे, दूरच्या माणसाशी बोलण्याचे – म्हणून माणूस जर टेलीफोन बरोबरच गप्पागोष्टी करू लागला तर कसे चालेल? गाडीत बसून माणूस दूरवर प्रवास करू शकतो, म्हणून तो गाडीतून उतरलाच नाही तर काय उपयोग?
शिक्षणाचा उद्देश्य
शिक्षणाचा उद्देश्य हा केवळ मुलांना माहिती पुरविणे एवढा नाही – त्यासाठी तर गुगल आणि विकिपीडिया आहेत. शिक्षणाद्वारे मुलांना स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवता आली पाहिजे, स्वत:चे निर्णय स्वत: घेता आले पाहिजेत – हा भाग तर आपण आत्ताच पाठांतर, पोपटपंची आणि मार्क यांच्या मागे लागून बराचसा निकामी केला आहे. मुले ज्या समाजात, ज्या संस्कृतीत मोठी होतात त्याचं महत्व, त्याचा अभिमान हा मुलांना वाटला पाहिजे – कारण त्यातूनच मुलांचा स्वत:चा आत्मसन्मान निर्माण होतो. आता “पावनखिंडीत मोजक्या मावळ्यांनिशी आपल्या छातीचा कोट करून झुंजणारे बाजीप्रभू अखेरीस धारातीर्थी पडले” किंवा “तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या मुरारबाजीचा पराक्रम पाहून स्वत: दिलेरखान पण विस्मयचकित झाला” ही वाक्ये इंग्रजीतून आपल्या मुलांना ऐकवून बघा. त्यांच्या चेहऱ्यावरची माशी तरी हलेल काय? मग कुठला अभिमान आणि कुठला आत्मसन्मान! मग फ़क़्त अनुकरण करण्यात धन्यता मानणारी अजून एक पिढी तयार होते. स्वत:च म्हणून काही रहात नाही – शोध कुणीतरी दुसरे लावतात, आपण त्यांची ‘लेटेस्ट प्रोडक्ट्स’ मिरवायची – फ़रक़ एवढाच कि Apple की Samsung. शोज कुणीतरी बनवायचे आणि आपण ते नाव बदलून जसे च्या तसे उचलायचे – कोणी “अमेरिकन आयडॉल” बनवला कि आपला “इंडियन आयडॉल” आहेच, कोणी “बिग ब्रदर” बनवला कि आपला “बिग बॉस” आलाच.
शिक्षणातून मुलांना स्वत:ची आवड-निवड चांगली समजली पाहिजे, आपल्याला कुठल्या विषयात गती आहे हे कळले पाहिजे, जेणेकरून मोठी झाल्यावर ते आपला करियर कशात करायचं याचा निर्णय ते घेऊ शकतील. इथे आपण आधीच नीरस असलेल्या शिक्षणाला, परक्या भाषेद्वारे अजूनच जड, क्लिष्ट बनवत आहोत, खऱ्या शिक्षणापासून दूर नेत आहोत. आपल्या कडे टागोरांच्या सारखे द्रष्टे पुरुष झाले आहेत, ज्यांनी भारतातल्या मुलांसाठी आणि भारतीय वातावरणात योग्य होतील असे ‘शांती-निकेतन’ सारखे प्रयोग केले आहेत, मुलांना निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण सध्या मुलेच काय, आपण सर्वच जण निसर्गापासून दूर जात आहोत, आणि एवढ्यानेही भागात नाही म्हणून कि काय आता मुलांची नैसर्गिक भाषा पण तोडत आहोत.
मुलांच्या दृष्टीकोनातून
अशी फार कमी मुले असतील ज्यांना रोज सकाळी उठून शाळेला जाताना मनापासून आनंद होत असेल. शेवटी कितीही आवश्यक असली तरी शाळा हे मुलांच्या दृष्टीने एक ओझं आहे. मुलांना शाळा नीरस वाटण्यामागे (मधल्या सुट्ट्या सोडून) बरीच कारणे आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे शाळेत शिकवलेल्या विषयांचा दिवसभरातील करायच्या गोष्टींशी काही संबंध नसणे. आपल्या शाळेतले नावडते विषय आठवा – ‘नागरिकशास्त्र’ हा अगदी सर्वमान्य नावडता विषय – कारण ती संसद, ती न्यायालये, विधिमंडळ हे सगळं बघितलय कुणी? देशाच्या कुठल्या भागात कुठली खनिजे मिळतात, स्टेप्स व प्रेअरीज मधील लोकांची वेशभूषा कुठली असे प्रश्न – किंवा व्याकरणाचे नियम, इतिहासातील सन, मूलद्रव्ये आणि त्यांचे गुणधर्म – हे सगळे विद्यार्थीवर्गाच्या तिरस्काराचे विषय. त्या मानाने मराठी मधील गोष्टीवजा धडे, इतिहासातील गोष्टी, किंवा रसायनशास्त्रातील प्रयोग हे तसे मनोरंजक असायचे. कारण हेच की जे शाळेत शिकवले जाते, ते जर बघायला, अनुभवायला मिळत असेल तर मुलांना त्या मध्ये अधिक आवड, अधिक जिज्ञासा निर्माण होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, मुलांचे शिक्षण जेवढे त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींच्या समीप, तेवढे ते मुलांसाठी चांगले. आणि हे अजून एक महत्वाचे कारण आहे, मातृभाषेतून शिकण्यामागे – नाहीतर परक्या भाषेतून हे अंतर अजून वाढेल.
image-courtesy: http://asiasociety.org/files/0213-mothertongue_0.png