
प्रथम क्रमांकाचा मुलगा
एक गाव होतं. गावात एक शाळा होती. शाळेत खूप वर्ग होते. त्यातल्याच एका वर्गातील ही कथा आहे. त्या वर्गात पंचवीसेक मुले होती. काही हुशार होती, तर काही ढ. काही सधन होती, तर काहींची परिस्थिती बेताची. कुणी खेळात हुशार, तर कुणी इतर कुठल्या कलेमध्ये. पण या सर्वांमध्ये एक मुलगा असा होता, की जो प्रत्येक बाबतीत इतरांपेक्षा आघाडीवर होता. सर्वात पुढे, सर्वात अग्रेसर. सगळेजण त्याला गमतीने ‘प्रथम क्रमांकाचा मुलगा’ म्हणायचे. सर्वांना त्याचं मोठं कौतुक वाटे. शाळेला भेट देण्यासाठी कुणी परदेशी पाहुणे आले, तर या मुलाची आवर्जून त्यांच्याशी ओळख करून दिली जायची. “हा आमचा प्रथम क्रमांकाचा मुलगा” – शिक्षक मोठ्या कौतुकाने सांगत. त्याच्या घराण्यातच ही प्रथम क्रमांकावर राहण्याची परंपरा चालत आली होती. त्यामुळे मुलाला घरातील ज्येष्ठांचं नेहमी मार्गदर्शन लाभत असे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी पाडलेला बुद्धिवादी पायंडा आपण तसाच पुढे चालवत आहोत या कल्पनेने मुलाचं मन अभिमानाने भरून येत असे. त्याचा पहिला नंबर कधी चुकला नाही.
अशीच वर्षामागून वर्षे गेली. मुलाचा वर्गात हात धरू शकेल असा दुसरा कोणीच बहाद्दर नव्हता. मुलाचा आत्मविश्वास वाढू लागला … हळूहळू त्याचं अति-आत्मविश्वासामध्ये रुपांतर झालं. आपण विशेष श्रम केले नाहीत तरी आपण पहिले येऊ शकतो, किंबहुना त्यासाठीच आपला जन्म अशी उच्च परंपरा असलेल्या घरात झाला असावा याबद्दल त्याची खात्रीच पटली. हळूहळू तो कोणाला किंमत देईनासा झाला, स्वत:च्या यशाबद्दल बेफिकीर राहू लागला. आपल्या परंपरेविषयी त्याला जो अभिमान होता, तो हळूहळू उर्मटपणा कडे झुकू लागला. आपला भूतकाळ गोंजारायला त्याला भारी आवडे. आता काही नवीन करण्यापेक्षा आपल्या घराण्याचा इतिहास आठवत बसणे आणि भविष्याविषयी स्वप्नरंजन करणे हाच त्याचा छंद झाला. त्यातच त्याचा वेळ वाया जाऊ लागला. कधी कधी शिक्षकांना, पालकांना, मित्रांना त्याच्या या वागण्याची काळजी वाटे. ते त्याला तसे बोलूनही दाखवित. मुलाचा हेका कायम होता, “…. ते काहीही असो, पहिल्या क्रमांकावर मीच राहणार”.
वर्गात इतरही मुले होती. त्यांच्या पाठीशी मिरवता येण्याजोगी घराण्याची उच्च परंपरा नव्हती, ना पहिल्या क्रमांकाचं बिरूद! त्यांना मिळेल त्या साधनांनिशी प्राप्त परिस्थितीशी झगडत, हरप्रकारे प्रयत्न करून यश मिळवणं भाग होतं. लवकरच शाळा संपेल, आणि मग बाहेरच्या जगात, खुल्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरावं लागेल याची त्यांना जाणीव होती. ती मुले स्वत:च्या कुवतीनुसार धडपडू लागली. कुणी पाहुणे जर शाळेला भेट द्यायला आले, तर ही मुले स्वत:हून काहीतरी निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागली. प्रथम क्रमांकाच्या मुलाचं मात्र तसं नव्हतं. त्याला मुद्दामहून पाहुण्यांना भेटण्यासाठी पाचारण केलं जात असे. मोठ्या ताठ मानेने, अत्यंत शिष्टपणे तो आल्या पाहुण्यांची भेट घेत असे. इतर मुलांची ती केविलवाणी धडपड पाहून त्याला मनातून खूप हसायला येत असे. वर्गात परत येऊन तो मिटक्या मारत आपल्या घराण्यातील लोकांच कर्तुत्व आठवत बसे.
असेच दिवस जात राहिले. इतर मुले कष्ट करतच राहिली, प्रथम क्रमांकाचा मुलगा स्वप्ने पाहताच राहिला.
या सगळ्याचे परीणाम दिसू लागले. इतर मुलांची टक्केवारी सुधारू लागली, याची टक्केवारी घसरू लागली. तरीदेखील त्याचा पहिला क्रमांक कायम होता. पण आता इतरांनी त्याला हळूहळू ‘प्रथम क्रमांकाचा मुलगा’ म्हणणे बंद केले. मुलाला हे जाणवू लागले. आता तोच इतरांदेखत स्वत: ला ‘प्रथम क्रमांकाचा मुलगा’ म्हणवून घेऊ लागला.
आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर याचा एकट्याचा हक्क होता; आता त्यामध्ये वाटेकरी होऊ लागले. त्याच्या शेजारीच बसणाऱ्या मुलाने अभ्यासात एवढी नेत्रदीपक प्रगती केली, की संपूर्ण शाळेला त्याची दाखल घ्यावी लागली. त्या मुलाची अभ्यास करण्याची पद्धती एकदम नवीन धर्तीची होती. शाळेतील इतर मुलांना पण त्याचं अभ्यासाचं मॉडेल आवडलं. मात्र प्रथम क्रमांकाच्या मुलाला त्याचं काही नव्हतं.
“तू हुशार आहेस खरा, पण तरीदेखील तुझ्या शेजाऱ्याची अभ्यास करण्याची पद्धती पाहून घे. तुला झाला तर त्यामुळे फायदाच होईल”, शिक्षक प्रथम क्रमांकाच्या मुलाला म्हणाले.
“हुं! काल शिकून शहाणे झालेल्यांनी, आमच्या सारख्या पिढ्यानपिढ्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या लोकांना शिकवू नये”, प्रथम क्रमांकाचा मुलगा नाक उडवत म्हणाला. घराण्याचा अभिमान त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात उतरला होता. इतका की या अभिमानाचा देखील त्याला अभिमान वाटत असे.
पाठीमागे बसणाऱ्या चार मुलांनी तर अजूनच कमाल केली. त्यांनी एकत्र मिळून अभ्यास करायला सुरुवात केली, बाहेरून शिकवण्या लावल्या, कॉम्प्युटर आणि इंटरनेट च्या ज्ञानावर भर दिला… हळूहळू “माहिती तंत्रज्ञानात हातखंडा असलेली मुले ” म्हणून त्यांचा शाळाभर लौकिक झाला. प्रथम क्रमांकाच्या मुलाने देखील आपली बोटे थोडीफार कॉम्पुटर वर चालवून पहिली. तेवढ्या भांडवलावर त्याने आपण आता माहिती तंत्रज्ञानात देखील आघाडीवर असल्याचे जाहीर केले. आजकाल त्याला एखादी नवीन गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करायची गरज वाटत नसे. तसं नुसतं जाहीर जरी केलं तरी काम भागत हे त्याला कळून चुकलं होतं. शिवाय आपण ज्यात हात घालू त्यात आपण आपसूक प्रथम क्रमांकावर पोहोचतोच अशी त्याने स्वत:च्या मनाची समजूत करून घेतली होती.
अर्थात कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही. भोवताली बदलत चाललेल्या परिस्थितीची जाणीव त्याला होत होती. वरून किती जरी बेपर्वा दिसला तरी आत कुठेतरी त्याचा आत्मविश्वास खचला होता. नक्की काय चुकलं समजत नव्हतं. अशावेळी मन सरळ, स्वच्छ सत्य बघण्यापेक्षा स्वतःला भ्रामकतेच्या धुरकट पडद्यात लपेटून घेणं पसंत करतं. इथेही तेच झालं.
“कुणीतरी जाणून बुजून आपल्या प्रगतीत खीळ घालतंय”, प्रथम क्रमांकाच्या मुलाचं मन साशंक झालं.
“ती तिकडे लांब पाहिल्या बाकावर बसणारी दोन मुलं. ती उठसुठ माझ्याकडे मदत मागायला येत असतात. स्वत:ची ऐपत नाही ती नाहीच, उगीच माझ्याकडून या न त्या वस्तू उचलून नेत असतात. त्यांच्यामुळे माझा अभ्यास होईनासा झालाय”, त्याने शिक्षकांकडे तक्रार केली.
“अरे, पण तुम्ही सगळी एकाच वर्गातील मुले. मग एकमेकांना मदत करायला नको?” शिक्षक हसून म्हणाले.
“एकमेकांना मदत वगैरे हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला मीच सापडतो. बाकीच्यांचं काय? त्या तिकडे उत्तरेला बसणाऱ्या मुलांचा स्वत:चा एक गटच आहे. हे माझ्या मागे बसलेले चौघे, त्यांना का नाही सांगत तुम्ही बाकीच्याबरोबर मिसळून घ्यायला? मदत पाहिजे तेंव्हा मात्र सगळे माझ्याकडे येतात… अर्थात, मी पहिल्या क्रमांकावर आहे त्याशिवाय का ते माझ्याकडे मदतीसाठी येतात”, समाधानाने हसून तो म्हणाला.
शिक्षकांना इतरही कामे होती. त्यांनी दुर्लक्ष केले.
दिवस सरत होते. वार्षिक परीक्षा झाली, निकालाचा दिवस आला. निकाल ऐकण्यासाठी वर्गात मुले, शिक्षक, पालक जमले होते. दरवर्षी पहिल्या क्रमांकाचा मुलगा ८०-९०% गुणांनी पास होत असे. या वर्षी मात्र त्याला जेमतेम ७०% मिळाले. या उलट ज्या मुलांना पूर्वी ४०-५०% गुण मिळायचे, ते या वर्षी ६०-६५%गुणांनी उत्तीर्ण झाले होते. प्रथम क्रमांकाचा मुलगा बेगुमान होता. त्याचा चेहरा अभिमानाने फुलून आला. “सांगत होतो की नाय, पहिल्या नंबरावर मीच! घासून नाही, तर ठासून येणार!”, उभा राहून वर्गावर नजर टाकत तो म्हणाला.
मुख्याध्यापकांनी त्याच्या कडे दुर्लक्ष केले आणि सर्व वर्गाला संबोधित करण्यासाठी ते उठून उभे राहिले.
“वर्गातील कित्येक मुलांनी कौतुकास्पद प्रगती केली आहे. टक्केवारीत कमालीची सुधारणा झाली आहे. असेच प्रयत्न करत रहाल तर यशाचं शिखर तुमच्यापासून दूर नाही”, कौतुकाने वर्गावर नजर टाकत ते म्हणाले.
“पहिला क्रमांक ही काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. आधीच्या पिढ्यांनी तो स्वकष्टाने मिळवला, म्हणून आपल्याला पण तो वारसाहक्काने विनासायास मिळेल असे कुणी समजू नये.”, तुटकपणे ते म्हणाले. “उलट आधीच्या पिढ्यांकडून शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांची तळमळ हीच त्यांची शिकवण आहे. ती विसराल तर भविष्य अंधकारमय आहे.”
पहिल्या क्रमांकाच्या मुलाचा स्वाभिमान (ज्याचा त्याला नेहमी अभिमान वाटत असे) डिवचला गेला. “कुणी आम्हाला गृहीत धरू नये…”. गर्जना करत तो जागेवरून उठला. हातातील कागद नाचवत तो आवेशाने बोलू लागला.
“ही गेल्या पंधरा वर्षातील माझ्या प्रगतीची आकडेवारी आहे … तुम्हाला इतर मुले अधिक प्रिय असतील कदाचित, पण आकडेवारी हीच दर्शविते की अजून मीच प्रथम क्रमांकाचा मुलगा आहे. मीच सर्वांची पहिली पसंत आहे. माझ्या घराण्यात कित्येक जाणते पुरुष होऊन गेले, अजूनही आहेत. मला पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे. मी विकासाभिमुख आहे . मी ….”
शिक्षकांनी हताशपणे मान खाली घातली!
|समाप्त|
टीप: सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. जर भाषणातून कुण्या मंत्र्याने, नेत्याने, पक्षाने आकडेवारी दाखवून महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी भाष्य केले तर एकदा ही कथा एकदा जरूर आठवावी. ज्या थोर पुरुषांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो, ज्यांचा जयजयकार करतो, ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण करतो (आणि ज्यांचे वेळप्रसंगी पुतळे उखडून काढतो), त्यांचे अपार कष्ट, त्याग, परिश्रम हे देखील लक्षात घ्यावेत. परंपरेचा, इतिहासाचा अभिमान बाळगताना वर्तमानाविषयी पण आस्था दाखवावी. वरील कथेला शेवट नाही, कारण तो अद्यापि आपल्या हातात आहे.
4 Responses to प्रथम क्रमांकाचा मुलगा